Sunday, 2 April 2017

शतजन्म शोधिताना...

नाट्यसंगीत हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे त्या विषयी लिहिताना मुळात माझं संगीत या विषयात ज्ञान फार तोकडं आहे हे आधीच मान्य करतो. त्यामुळे काही चुकलं तर संगीतातील  तद्न्य व्यक्तींनी क्षमा करावी आणि अर्थात चुका सांगाव्यात.

बरेच दिवस काहीतरी लिहावं हे मनात होतं पण कुठून आणि कशाने सुरुवात करावी हे सुचण्यात बराच वेळ गेला. आणि गमतीचा भाग म्हणजे या गुढीपाडव्यापासून लिहायला सुरुवात करावी असं मनात आलं आणि जे गीत डोळ्यासमोर आलं ते भैरवी रागातलं नाट्यपद.. म्हणजे सुरुवात भैरवी पासून व्हावी हा एक वेगळाच योग आहे. पण त्यापासून लिहायला सुरुवात करणारे.

त्या पदाविषयी काही लिहिण्याआधी त्या गीतकाराविषयी सांगितलं कि हेच गीत सगळ्यात आधी का सुचलं हा प्रश्नच विरून जातो. पण त्या व्यक्तीमत्वाविषयी लिहिताना नुसत्या नावानेच दिपून जायला होतं आणि ते नाव म्हणजे " स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ". एक क्रांतिकारक, द्रष्टा विचारवंत, कवी अशी ओळख सावरकरांविषयी सगळ्यांनाच आहे. पण एक नाटककार म्हणून सावरकर यांची वेगळीच प्रतिभा त्यांच्या नाटकातून आपल्यासमोर येते आणि थक्क करून सोडते. मनातली देशप्रेमाची भावना, देशाविषयीचे विचार आणि द्रष्टेपणा हे सगळंच पदोपदी आपल्याला जाणवतं..

सन्यस्तखड्ग या नाटकात एक शूरवीर योद्धा आणि बुद्ध यांच्यामधील संवाद यातून नाटकाची कथा पुढे सरकते. त्या योद्ध्याच्या मनात असलेले विचार आणि बुद्ध यांचे विचार यांच्या मंथनातून अंतिमतः तो योद्धा संन्यासधर्म स्वीकारतो. नाटक संपताना याच विचारांवर येणारी भैरवी त्या विषयाची व्याप्ती केवढी मोठी आहे हे सांगून जातं.

शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्यमालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥

या पहिल्याच कडव्यात  एक योद्धा आयुष्यभर ज्या तत्वांवर विश्वास ठेवून लढतो त्या तत्वांच्या विरुद्ध अशा संन्यासी तत्वाला स्वीकारताना तो एक क्षण आयुष्यात किती बदल घडवतो याची व्याख्या चपखलपणे सावरकरांच्या प्रतिभेतून आपल्यापुढे येते. शतजन्म म्हणजेच शंभर जन्म शोधून, अनेक दुःखे सुद्धा जिथे व्यर्थ ठरली आणि शेकडो सुर्यमालिकांच्या दिव्यांची आरास देखील व्यर्थ करणारा हा एक क्षण आहे असं सावरकर म्हणतात तेव्हा एका वेगळ्याच जगात आपल्याला घेऊन जातात.

तेव्हां पडे प्रियासी । क्षण एक आज गांठी ।
सुखसाधना युगांची । सिद्धीस अंति गांठी ॥

आणि या पुढच्या कडव्यात त्या क्षणाची महती अजून विस्तारून सांगताना युगांमागून युगे साधनेत जात असताना हा भाग्याचा एक क्षण, एक सुखाचा क्षण अंतिमतः आपल्या आयुष्यात येतो असं म्हणताना तो क्षण किती महत्वाचा आहे ह्याची महती आपल्याला जाणवल्यावाचून राहत नाही.

हा हाय जो न जाई । मिठि घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥

आणि हा इतका महत्वाचा क्षण आयुष्यात आलेला असताना, तो अनुभव घेत असताना वेळ मात्र त्याच्या प्रमाणेच पुढे सरकते आणि निमिषार्धात इतका महत्वाचा क्षण आयुष्यात येऊन निघूनही जातो. प्रेयस असा त्या घटनेचा आनंद घेईपर्यंत, त्याला कवेत घेऊन मनाला जाणवेपर्यंत तो क्षण निघूनही जातो. आयुष्य तसच पुढे जात असतं आणि एक रसिक म्हणून आपली देखील अशीच अवस्था होते. ह्या गीताचे शब्द, त्या काव्याचा अर्थ आपल्या मनाला जाणवेपर्यंत हे गीत आणि त्याचसोबत सन्यस्तखड्ग हे नाटक देखील आपला निरोप घेते. 

हे नाटक बघून बाहेर पडताना किंवा हे गाणं कधीही ऐकला तरी ह्या गाण्याचा अर्थ आणि त्याचसोबत सावरकरांची प्रतिभा मनात रेंगाळतच राहते आणि त्याच भारावलेल्या अवस्थेत मनोमन आपण त्या प्रतिभेच्या मानवी रुपासमोर नतमस्तक होतो !!!

आज इथेच थांबतो.. पुन्हा नवीन काहीतरी घेऊन तुमच्यासाठी येईनच.... तोपर्यंत लोभ असावा !!!

No comments:

Post a Comment