परवा बऱ्याच दिवसांनी कपडे
खरेदीसाठी म्हणून बाहेर पडलो. स्त्री आणि पुरुष यांच्या खरेदी करण्याच्या
पद्धतीमध्ये किती फरक पडतो ते मला त्या दिवशी कळलं. कारण मुळात पुरुषांसाठी कपडे
घ्यायचे म्हणजे फार मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. एक तर शर्ट किंवा टी-शर्ट आणि पॅण्ट
एवढेच पर्याय उपलब्ध असतात. पण बायकांसाठी कपडे घेताना मात्र अनेक पर्याय उपलब्ध
असतात. मग साडी, ड्रेस, वेस्टर्न असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. आणि एका साडीत तरी
किती प्रकार उपलब्ध असतात. कांजीवरम, बनारसी, पैठणी, इरकल, नारायण-पेठ, ही आणि अशी
अनेक नावं... किंबहुना सगळेच जणं म्हणत असतात कि बायकांबरोबर खरेदीला जाणं खूप
कठीण असतं. १० दुकानं फिरून पुन्हा पहिल्याच दुकानात येऊन त्या खरेदी करतात अशी
ओरड सगळ्यांकडून ऐकली जाते. पण मुळात मला असं वाटतं कि बायकांचा खरेदीच्या
बाबतीतला गोंधळ हा त्यांच्यापुढे असणाऱ्या बहुविध पर्यायांमुळे होतो.
तुम्ही म्हणाल कि लेखाचा
विषय काय आणि मी काय बोलतोय! पण मी हे उदाहरण दिलं जे प्रत्येक वाचकाला नक्की
पटेल. आणि आता जेव्हा आपण विषयाचा गांभीर्याने विचार करू तेव्हा आपल्याला नक्की
पटेल कि आजच्या तरुण पिढीपुढे, पौगंडावस्थेतील मुला-मुलींपुढे करीयर चे अनेक
पर्याय उपलब्ध आहेत. पूर्वीचा अप्रगत गणला जाणारा भारतदेश आज विकसनशील देशांमध्ये
गणला जातो. आज देशाने शिक्षण, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे.
प्रगतीबरोबर करीयरच्या नवनवीन वाटा सगळ्यांपुढे खुल्या झाल्या आहेत. पण याचमुळे
खरं सांगायचं झालं तर आजच्या युवा-पिढीचा गोंधळ उडलेला आहे.
या आधीच्या पिढीच्या वेळी
शिक्षण खूप सोपं होतं. सायन्स, आर्टस, किंवा कॉमर्स या ३ शाखा उपलब्ध होत्या.
सायन्स म्हटलं कि डॉक्टर किंवा इंजिनियर, आर्ट्स घेणारे प्रोफेसर आणि कॉमर्स
घेणारे सगळे बँकेत किंवा सी.ए होऊन आपापले व्यवसाय करत असत. पण आजचं चित्र खूप
बदललं आहे. मुळात आज सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स या शाखांबरोबरच हॉटेल मॅनेजमेंट,
मास-मिडिया, CWA, CFA, ही आणि अशी अनेक नवनवीन क्षेत्रं आजच्या पिढीपुढे सहजपणे
उपलब्ध आहेत. पूर्वीच्या काळात शेती करण्यासाठी शेतकऱ्याला कोणतीही पदवी लागत
नव्हती. अनुभवाच्या आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ज्ञानाच्या बळावर तो
शेतकरीराजा संपूर्ण भारताची सेवा करत होता. पण आज शेतकी महाविद्यालयं अनेक ठिकाणी
सुरु झाली असून अनेक शेतकरी आज शेती-तंत्रज्ञानात पदवीधर आहेत. पूर्वीच्या काळात
“फॅमिली डॉक्टर” अशी संकल्पना रूढ होती. कारण त्याकाळात फक्त M.B.B.S एवढी डिग्री
घेऊन पुरत असे. पण आज तशी परिस्थिती राहिली नाहीये. आज कुठच्याही पदवीनंतर
पदव्युत्तर शिक्षणाशिवाय पर्याय उरलेला नाही. आज चांगल्या पगाराची नोकरी, चांगलं
घर हे सगळं मिळवायचं असेल तर किमान २-३ पदव्या असणं ही काळाची गरज आहे, किंबहुना
तसा अलिखित नियमच झाला आहे असं म्हणायला हरकत नाही.
या सगळ्याचं मूळ शोधायचं
झालं तर जरा अडीच दशकं मागे जावं लागेल आपल्याला. १९९० सालच्या सुमारास आपले
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारताची वाटचाल ही वेगळ्या वाटेने होणार हे
जाहीर केलं. जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरण ही त्रिःसूत्री त्यांनी भारताच्या
आर्थिक आणि इतर क्षेत्रातील धोरणांमध्ये लागू केली. आणि त्या दिवसापासून आपल्या
देशातील तरुण पिढीच्या भविष्याचं रूप संपूर्णतः पालटून गेलं. परदेशातील अनेक
उद्योग भारतात येऊ लागले. त्या उद्योगांसाठी आवश्यक असणारं शिक्षण देखील त्यामागून
भारतात दाखल झालं. परदेशातील अनेक विद्यापीठांनी शिक्षणाचे नवीन पर्याय आपल्या
देशात उपलब्ध करून दिले. आणि याचमुळे भारतातील तरुणांपुढे करीयरच्या नवीन वाटा
खुल्या झाल्या आणि आजही नवनवीन पर्याय रोजचे उपलब्ध होताना दिसत आहेत.
याचसुमारास कॉम्प्युटर ने
भारतातील उद्योगांमध्ये हळुवार पावलांनी शिरकाव केला. हे पाउल हळू हळू सगळ्यांचं
आयुष्यच व्यापून टाकेल हे कोणालाच त्या काळी माहित नव्हतं. आता तर भारतात या
क्षेत्राचा इतका प्रसार झालाय कि भारतातील “सत्या नादेला” या व्यक्तीने microsoft
या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये अत्यंत मानाचं C.E.O हे पद पटकावून भारतीयांच्या
शिरपेचात मानाचा तुरा खोचला आहे. पण असं जरी असलं तरी कॉम्प्युटरच्या वापरामुळे
नवनवीन प्रकारचं शिक्षण आणि नवनवीन करीयरचे पर्याय दिवसेंदिवस वाढत आहेत.
या सगळ्या कारणांमुळे
आजच्या तरुणांची अवस्था थोडी बिकट आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मी मगाशी
म्हटलं तसे आजच्या पिढीपुढे अनेक वाटा उपलब्ध आहेत. आणि त्यामुळेच आजच्या पिढीला
नक्की काय करायचं हे कळत नाहीये. आपण आपल्या ज्येष्ठांकडून मार्गदर्शन घेतोच आहोत.
पण त्यांच्या वेळची परिस्थिती अत्यंत वेगळी होती. आजच्या सारखी जीवघेणी स्पर्धा
आणि प्रचंड वाढलेली लोकसंख्या त्याकाळात नव्हती. त्यामुळे त्यांचा सल्ला महत्वाचा
असला तरी आजच्या काळात तो अचूक ठरेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे आजच्या
तरुणांना अचूक मार्गदर्शनाची खरं तर गरज आहे. त्यांच्यासमोर आदर्श अनेक
आहेत, पण त्या आदर्शांपर्यंत पोचण्याची नक्की वाट आजच्या तरुण पिढीला सापडत
नाहीये. जंगलात अमावास्येच्या रात्री माणूस फिरत असेल तर त्याला “चकवा” लागतो असं
म्हणतात. मुळात चकवा म्हणजे त्याला नक्की रस्ता सापडत नाही आणि तो माणूस
त्याच-त्याच जागी पुन्हा-पुन्हा फिरत राहतो. करीयरच्या बाबतीत आजच्या तरुणांचं तसं
काहीसं झालंय.
या सगळ्याचा विचार करताना
संदीप खरे यांच्या कवितेच्या काही ओळी आठवतात. त्या अश्या,
आत्ता इथे हवा अगदी ढगाळ ढगाळ आहे
कुठलाच संदेश माझ्यापर्यंत थेट येत नाहीये
इतकं उलट सुलट साचलंय आभाळाच्या मनात
नक्की कुठला ऋतू आहे तेच कळत नाहीये...
आत्ता इथे हवा अगदी ढगाळ ढगाळ आहे
कुठलाच संदेश माझ्यापर्यंत थेट येत नाहीये
इतकं उलट सुलट साचलंय आभाळाच्या मनात
नक्की कुठला ऋतू आहे तेच कळत नाहीये...
बाकी पक्षीसुद्धा कसे सैल सैल उडतायत
उड्डाणाला आपले आपले पंख घेऊन निघतायत
त्यांनासुद्धा बहुतेक नक्की दिशा नाहीये कळत
ढग येतील तसे तसे जातायत वळत वळत...
उड्डाणाला आपले आपले पंख घेऊन निघतायत
त्यांनासुद्धा बहुतेक नक्की दिशा नाहीये कळत
ढग येतील तसे तसे जातायत वळत वळत...
पण असं असलं तरी परिस्थिती
संपूर्णतः निराशावादी किंवा संपूर्णतः वाईट नक्कीच नाहीये. आपल्याला नक्की कसली
आवड आहे, किंवा आपल्याला नक्की काय येतंय याचा विचार करणं खरंच गरजेचं आहे.
आपल्याला काही वेगळं करता येत असेल, तर वेगळ्या वाटांवरून चालायला हरकत नाही.
राजरस्ते सर्वमान्य असले तरी तरी त्यावर चालणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे.
त्यामुळे “रतन टाटा” म्हणतात त्याप्रमाणे, “तुम्हाला वेगाने पुढे जायचं असेल तर
नेहमी एकट्याने चालावं.” त्यामुळे हमरस्ता सोडून एखादी नवीन पायवाट शोधायला किंवा
वेळप्रसंगी नवीन वाट तयार करायला सुद्धा हरकत नाही हे आजच्या पिढीने लक्षात
घ्यायला हवं. आणि आपल्याला करीयर करताना पैसे महत्वाचे आहेतच, पण त्याचबरोबर आनंद
कशात मिळणारे तेही लक्षात घ्यायला हवं. आर्थिक सुबत्तता आणि मानसिक आनंद याचं
समतोल साधता आला तर आयुष्य नक्कीच सुखी होईल. आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते
स्वतःला मनापासून काय करावसं वाटतं ते नेमकं ओळखणं. ते जर का कळलं तर मग यश आणि
त्याचबरोबर आनंद तुमचाच आहे हे आजच्या तरुणाईने लक्षात घ्यायला हवं. म्हणूनच
कदाचित आपल्या पूर्वजांपासून एक म्हण अत्यंत प्रचलित आहे आणि इथे ती अत्यंत चपखल
बसते, ती म्हणजे,
“ ऐकावे जनाचे परी करावे मनाचे !! “
“ ऐकावे जनाचे परी करावे मनाचे !! “